पिंपळगाव–सारकिनी वनपरिसरातील आगीचे गूढ कायम! जबाबदारांवर कारवाईची टांगती तलवार; नीलगाय शिकार प्रकरणाने वनविभाग घेरला

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०५ मे
महागाव :-
महागाव तालुक्यातील काळी (दौ) वनपरिक्षेत्रात घडलेल्या नर्सरी जळीत आणि नीलगाय शिकार या दोन घटनांमुळे वनविभाग अडचणीत सापडला आहे. पिंपळगाव–सारकिनी परिसरातील आगीचे गूढ अजूनही कायम असून,जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपळगाव–सारकिनी परिसरात कक्ष क्रमांक ८१३ मधील कॅम्पा योजनेतील गुंज वर्तुळात येत असलेल्या रोपवन क्षेत्रातील सुमारे अडीच हेक्टरवरील वृक्षलागवड आगीत जळून खाक झाली. ही आग अपघात नसून, काही गैरव्यवहार लपवण्यासाठी मुद्दाम लावली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, दि. १० मार्च २०२६ रोजी पोखरी शिवारात नीलगाय शिकारीचा प्रकार समोर आला होता. यापूर्वीही अशा घटना घडूनही वेळेत कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस पावले न उचलल्याने वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाची भूमिका संशयात आली आहे.
या सर्व घडामोडींची दखल घेत सहायक उपवनसंरक्षक शशांक कदम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित वनरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात भाजपचे पुसद जिल्हा चिटणीस सुनिल रामभाऊ टेमकर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे नुकत्याच चार दिवसांपूर्वी निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी त्यांची मागणी आहे.
वनविभागाच्या कामकाजाबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असून, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पिंपळगाव–सारकिनी येथील आग आणि नीलगाय शिकार या दोन्ही प्रकरणांमुळे महागाव तालुक्यातील काळी दौलत वनपरिक्षेत्र सध्या चर्चेत आले असून,यात कार्यवाहीचा बागुलबुवा की ठोस अशी कार्यवाही होणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
