उटीत भरदिवसा जबरी चोरी; १४ लाखांचा ऐवज लंपास, गावात भीतीचं वातावरण

लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
तालुक्यातील उटी गावात भरदिवसा मोठी चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केली.
उटी येथील अनिकेत राजू गावंडे (वय ३०) हे शेतकरी असून महागाव येथे त्यांचे मेडिकल स्टोअर्स चे,दुकान आहे. ते रोज महागाव-उटी असा प्रवास करतात. २ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून चोरी केली.चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने जसे झुंबर, वेल, गोफ, अंगठ्या, बांगड्या,ओम लॉकेट तसेच चांदीचे दागिने चोरून नेले.यासोबतच सुमारे १.५ लाख रुपयांची रोख रक्कमही लंपास केली. चोरी गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे १३ लाखांहून अधिक आहे.
याचदरम्यान गावातील चेतन गावंडे यांची पल्सर दुचाकी (सुमारे ७५ हजार रुपये) देखील चोरीला गेली. त्यामुळे एकूण चोरी सुमारे १४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.या घटनेमुळे पोलिसांचा वचक संपल्याचे दिसून येते.अलीकडच्या काळात नव युवक विविध व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र असून यातूनच छोटीमोठी चोरी ,दरोडा या सारखे प्रकार सामोरे येतात. गावोगाव गावठी,देशी विदेशी दारू,जुगार,वरळी मटका यासारखे अवैध्य धंदे सुरू आहेत.शहरासह तालुक्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली असून या संदर्भात पोलिस प्रशासनाने आपली पोलिसी जरब कायम ठेवावी व चोरट्यांना तत्काळ जेरबंद करावे अशी जनभावना आहे.
