नर्सरी जळीत प्रकरणाचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना सोयर सुतक नाही !  पिंपळगाव–सारकिनी आगीचे गूढ कायम; नीलगाय शिकार प्रकरणानेही वनअधिकाऱ्यांची कोंडी

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मे.

 

 महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रात घडलेल्या नर्सरी जळीत आणि नीलगाय शिकार या दुहेरी घटनांमुळे वनविभागावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपळगाव–सारकिनी परिसरातील कक्ष क्रमांक ८१३ मधील कॅम्पा योजनेअंतर्गत असलेल्या रोपवन क्षेत्रातील सुमारे अडीच हेक्टरवरील वृक्षलागवड आगीत जळून खाक झाली. मात्र, घटनेला जवळपास महिना उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून आगीचा अधिकृत अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

ही आग नैसर्गिक नसून, काही गैरप्रकार दडपण्यासाठी मुद्दाम लावण्यात आल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.

दरम्यान, दि. १० मार्च २०२६ रोजी पोखरी शिवारात नीलगाय शिकारीचा प्रकार उघडकीस आला होता. यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडूनही संबंधितांवर वेळेत कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने ठोस पावले न उचलल्याने वन्यजीव संरक्षणाबाबत विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत सहायक उपवनसंरक्षक शशांक कदम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित वनरक्षक व अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे पुसद जिल्हा चिटणीस सुनिल रामभाऊ टेमकर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरण जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वनविभागाच्या कामकाजाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पिंपळगाव–सारकिनी येथील आग आणि नीलगाय शिकार या दोन्ही घटनांमुळे काळी दौलत वनपरिक्षेत्र सध्या जिल्हाभर चर्चेत आले आहे.

वन अधिनियमानुसार एक वृक्ष तोडल्यास दुसरा वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे बंधनकारक आहे. मात्र येथे शेकडो रोपे जळून खाक झाली असून, जंगलातील असंख्य सरपटणारे व लहान जीव आगीत मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

आंखें तो खोलो स्वामी… कॅम्पा की नर्सरी जल गई स्वामी…” अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता परिसरात ऐकायला मिळत असून, वनविभाग खरोखर कारवाई करणार की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

———————————————————————-

सहायक उपवनसंरक्षक म्हणतात अजून रिपोट आला नाही !

 

पिंपळगाव सारकिनि परिसरात कक्ष क्रमांक ८१३ मधील कॅम्पा योजनेतील गुंज वर्तुळात येत असलेल्या रोपवन क्षेत्रातील सुमारे अडीच हेक्टर क्षेत्रातील रोपवन जळून खाक झाले आहेत.यात महिन्याभरापासून सबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अजून ठोस रिपोट दिला नसल्याचे सहायक उपवनसंरक्षक शशांक कदम म्हणाले.त्यामुळे सदर प्रकरणात बासनात गुंडाळून ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या