ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्ट आक्रमक ! २० मे रोजी देशभर मेडिकल बंद; राळेगाव संघटनाही आंदोलनात सहभागी

लोकवेध न्यूज नेटवर्क / १४ मे.

 

राळेगाव :-

 

ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती आणि बनावट औषधांच्या वाढत्या प्रकारांविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे २०२६ रोजी एकदिवसीय “ऑल इंडिया केमिस्ट्स बंद”ची हाक दिली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राळेगाव तालुका केमिस्ट संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आनंद तुरणकर यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर राळेगाव येथे तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांची बैठक पार पडली. बैठकीत एकमताने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात केंद्र सरकारने ऑनलाइन औषध विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सवलतींमुळे पारंपरिक मेडिकल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. तसेच ऑनलाइन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून, रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, “ऑनलाइन औषध विक्रीमुळे बनावट औषधांच्या विक्रीला खतपाणी मिळत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी.”

दरम्यान, महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला असून, राज्यातील हजारो मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे २० मे रोजी अनेक भागांत नागरिकांना औषध खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवण्याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या