महागाव नगरपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटावरून सध्या शहरात जोरदार राजकीय हालचाली सुरू असून,कोट्यवधींचे कंत्राट आपल्या गटाकडे खेचण्यासाठी दोन प्रभावशाली गट आमनेसामने आल्याची चर्चा रंगली आहे. डमी ठेकेदारांना पुढे करून कंत्राट मिळविण्यासाठी पडद्यामागून मोठी फिल्डिंग लावली जात जात आहे.
विशेष म्हणजे, सध्या अवघ्या ३२ लाख रुपयांत सुरू असलेले घनकचरा व्यवस्थापनाचे काम नव्या निविदेत थेट १ कोटी २६ लाख २७ हजार रुपयांवर पोहोचल्याने ही चढाओढ वाढली आहे.
निविदा अर्जासाठी ५ हजार ५०० रुपये शुल्क तर १ लाख २७ हजार ९१३ रुपये बयाना रक्कम ठेवण्यात आली आहे.
या कंत्राटामध्ये शहरातील घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत वाहतूक करणे तसेच नालेसफाई आणि स्वच्छतेची इतर कामे समाविष्ट आहेत.
मात्र, सध्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.अनेक भागांत वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढत आहे. सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मनमानी सुट्ट्या, अपुरी साफसफाई आणि कामातील अनियमितता यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या कंत्राटासाठी काँग्रेस आणि उबाठा गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया खरंच पारदर्शक होणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी आता संबंधित ठेकेदारांचा अनुभव, पूर्वीचे काम, तक्रारी, कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि शासनाच्या नियमांचे पालन याची चौकशी करूनच कंत्राट देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
विशेष म्हणजे, कोट्यवधींच्या या कंत्राटात इतर नगरसेवक फारसे सक्रिय दिसत नसून, दोनच गटांमध्ये सुरू असलेल्या या राजकीय कुत्तर ओढीची महागावात जोरदार चर्चा सुरू आहे.