कॅम्पा निधीवर संशयाचे सावट; पुसद वन विभागातील कोट्यवधींच्या कामांची चौकशीची मागणी खासदार संजय देशमुखांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र; झाडांच्या प्रत्यारोपणापासून निधी वापरापर्यंत गंभीर आरोप
लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मे
यवतमाळ / पुसद
जिल्हा वार्षिक योजना २०२५ – २६ तसेच कॅम्पा (CAMPA) अंतर्गत वन विभागाला प्राप्त झालेल्या निधीच्या वापरात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.यासंदर्भात त्यांनी मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ वनवृत्त यांना अधिकृत पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासदार देशमुख यांनी पाठविलेल्या पत्रानुसार, संबंधित विकासकामांसाठी आवश्यक असलेली ई-निविदा प्रक्रिया न राबविता ऑफलाइन पद्धतीने निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच शासनाच्या पारदर्शकता तत्त्वांना अनुसरून बी-१ प्रक्रिया राबविण्यात न आल्याने संपूर्ण कामकाज संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
———————————————————————-
डीडी आणि कंत्राटदारांच्या नावांमध्ये विसंगती ?
पत्रात काही डिमांड ड्राफ्ट (DD) आणि संबंधित कंत्राटदारांच्या नावांमध्ये विसंगती आढळून आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. काही निवडक कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रात नमूद आहे.
२५२ झाडांच्या प्रत्यारोपणावर १.७८ कोटी खर्च; झाडे किती जिवंत ?
पुसद वन विभागांतर्गत बेलगव्हाण, शिरवळ आणि नागवडे नियत क्षेत्रांमध्ये २५२ झाडांच्या प्रत्यारोपणासाठी तब्बल १ कोटी ७८ लाख २१ हजार ५४३ रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात यापैकी किती झाडे जिवंत आहेत, याबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे. निधीचा अनावश्यक आणि अनियमित पद्धतीने वापर झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
———————————————————————-
रेल्वे नुकसानभरपाई निधीचाही वापर संशयाच्या भोवऱ्यात
रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे नुकसान भरपाई म्हणून प्राप्त झालेल्या अंदाजे ५ कोटी रुपयांच्या निधीचाही योग्य उपयोग न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वननिर्मिती अपेक्षित असताना निधीचा प्रभावी वापर न झाल्याने शासन नियम आणि आर्थिक शिस्तीचे उल्लंघन झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आंखो तो खोलो स्वामी… जंगल बचाओ स्वामी…”
दरम्यान, पुसद वन विभागातील कार्यपद्धतीवरून वृक्षप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपवनसंरक्षक श्री. बी. एन. स्वामी यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा वनवर्तुळात रंगली आहे.
वन विकास महामंडळ, नागपूर येथे पदस्थापना झाल्यानंतरही १ जुलै २०२३ रोजी पुन्हा पुसद येथे रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी काही बड्या मंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संताप वाढत असून, “आंखो तो खोलो स्वामी… जंगल बचाओ स्वामी…” अशा घोषणा परिसरात ऐकू येत आहेत.
चौकशी पूर्ण होईपर्यंत अकार्यकारी पदस्थापनेची मागणी
वनविकास महामंडळ, नागपूर येथे चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.गेल्या दोन वर्षांत पुसद वन विभागातील जंगल क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करून दोषींवर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी,अशी मागणी पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
