अवैध धंद्यांविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न ? भाजप पदाधिकाऱ्यांचा महागाव ठाणेदारांवर गंभीर आरोप; पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ मे.

 

महागाव :

 

महागाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे,मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात तक्रार केल्यानंतर आता भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे यांनीच महागाव पोलीस ठाणेदारांविरोधात गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विशाल डहाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी त्यांनी महागाव शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे, मटका व जुगार व्यवसायाबाबत सामाजिक हिताच्या दृष्टीने निवेदन दिले होते. मात्र, त्या तक्रारीनंतर महागाव पोलीस स्टेशनकडून डहाळे यांच्यावर घरगुती स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे ते पोलिसांविरोधात चिडून निवेदन देत आहेत,असे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वक्तव्य अपमानास्पद, पूर्वग्रहदूषित आणि सामाजिक प्रतिमा मलिन करणारे असल्याचा दावा डहाळे यांनी निवेदनातून केला आहे.मी,सन २०१० पासून भ्रष्टाचार,अवैध धंदे आणि विविध सामाजिक प्रश्नांविरोधात सातत्याने शासकीय विभागांकडे निवेदने देत आलो आहे. त्यामुळे माझी भूमिका ही सामाजिक बांधिलकीतून असून वैयक्तिक द्वेषातून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच,माझ्याविरोधातील कोणताही गुन्हा आजपर्यंत न्यायालयात सिद्ध झालेला नाही.तरीही मला अप्रत्यक्षपणे आरोपी ठरवून मानसिक व सार्वजनिक अपमान करण्यात आला,असा आरोपही त्यांनी केला आहे.

 

या प्रकरणात महागाव ठाणेदारांनी दिलेल्या उत्तराची सखोल चौकशी करण्यात यावी,अपमानास्पद वक्तव्याची दखल घेऊन योग्य कारवाई करण्यात यावी तसेच शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे, मटका आणि जुगार व्यवसायाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,अशी डहाळे यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे.यासोबतच,भविष्यात सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या नागरिकांचा मानसिक छळ होणार नाही,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या