पिकअप अडवणाऱ्या ठेकेदाराची दगड-लाकडांनी निर्घृण हत्या; उमरखेड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ मे

 महागाव :

 गोवंश वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या एका तरुण ठेकेदाराची दगड व लाकडांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवारी रात्री उमरखेड तालुक्यात घडली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी पिकअप चालक शेख सुल्तान शेख अल्लावली रा. सुकळी (जि.) व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत गजानन मारोती सुरोशे (वय ३४, रा. वडद ता. महागाव, सध्या बोरबन, उमरखेड) हे ठेकेदारीचे काम करीत होते. त्यांच्या भावाने ज्ञानेश्वर सुरोशे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गजानन हे २३ मे रोजी मित्र प्रसाद बाभळे याच्यासोबत किनवट येथे साईट पाहण्यासाठी गेले होते. परत येत असताना बिजोरा टोल नाक्याजवळ गोवंश वाहतूक करणारे पिकअप वाहन (MH 29 BE 8915) येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली.

टोल नाक्यावर पिकअप चालकाने वाहन थांबवण्याऐवजी टोल गेट तोडून उमरखेडच्या दिशेने वेगाने पलायन केले. त्यावेळी गोरक्षक महेश सुरोशे व त्याचे सहकारी मोटारसायकलवरून पिकअपच्या मागावर होते. घाट परिसरात आरोपी चालकाने मोटारसायकलला कट मारल्याने ती डिव्हायडरवर आदळली.

यानंतर गजानन सुरोशे यांनी आपल्या एस-क्रॉस कारने पिकअपचा पाठलाग सुरू ठेवत सुकळी (ज.) गावाजवळ वाहन गाठले. फिर्यादीनुसार, पिकअप शेतात थांबताच चालक व त्याचा साथीदार खाली उतरले आणि गजानन यांच्या कारवर दगड व लाकडांनी हल्ला चढवला. या भीषण मारहाणीत गजानन गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर आरोपींनी पिकअपमधील अंदाजे ११ ते १२ गोवंश जनावरे खाली उतरवून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गजानन यांना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या रक्तरंजित घटनेमुळे उमरखेड-महागाव परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरखेड पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या