महागाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळला मोठे यश मिळाले आहे. अवघ्या काही तासांत मुख्य आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात चार आरोपी निष्पन्न झाले आहेत.
महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे दरवाज्याचे कडी-कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी संगणक, प्रिंटर व इतर साहित्य चोरी करून नेले होते. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी दिल्यानंतर विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुरज प्रकाश पवार (वय २४, रा. फुकटनगर, महागाव) हा महागाव बाजारपेठ परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरज पवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या सांगण्यावरून चोरीस गेलेले दोन सीपीयू, एक मॉनिटर, एक प्रिंटर, की-बोर्ड व माऊस असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे गुन्ह्याचा संपूर्ण उलगडा होऊन चोरीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
महाविद्यालयातील घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.