१०० की त्यापेक्षा अधिक ? काळी वनातील सागवान तोडीचे गूढ; सत्य बाहेर आणण्याची जनतेची मागणी , तोडलेल्या सागवानाची ‘टिपी’ रोखण्याची जनभावना; नियमबाह्य वृक्षतोडीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०८ जून.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील काळी (दौलतखान) वनपरिक्षेत्रातील सागवान वृक्षतोडीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत असून, अधिकृत नोंदीनुसार १०० सागवान वृक्ष तोडण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक झाडांवर कुऱ्हाड चालल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार,संबंधित ठेकेदाराला ज्या क्षेत्रात वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली होती,त्या मर्यादेबाहेर जाऊनही काही सागवान वृक्ष तोडण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे का,याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नागरिकांनी वन विभागाकडे तोडण्यात आलेल्या प्रत्येक सागवान वृक्षाचे ठिकाण, त्यांचे ठुट (स्टंप) आणि संबंधित नोंदी सार्वजनिक करून पडताळणी करण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्ष मोजणी आणि पंचनाम्याद्वारे सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

नुकत्याच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,अशी मागणी होत आहे.

 

चौकशीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन किंवा नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशीही भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराला तोडण्यात आलेल्या सागवान वृक्षाची ‘टिपी’ (अंतिम मंजुरी/देयक प्रक्रिया) देऊ नये, अशी तीव्र जनभावना परिसरात व्यक्त होत आहे. आधी वास्तव समोर यावे आणि त्यानंतरच पुढील प्रशासकीय कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वनसंपत्ती ही पर्यावरणाची अमूल्य संपत्ती मानली जाते. त्यामुळे वृक्षतोडीच्या प्रत्येक प्रकरणात पारदर्शकता, जबाबदारी आणि नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. आता काळी वनपरिक्षेत्रातील सागवान तोडीच्या प्रकरणात नेमके किती वृक्ष तोडण्यात आले, याचे सत्य कधी समोर येते आणि वन विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

⬛चौकशीपूर्वी टिपी नको!

 

“आधी सत्य बाहेर येऊ द्या, मगच ठेकेदाराला लाभ द्या” अशी भूमिका नागरिकांनी घेतली असून, या प्रकरणातील प्रत्येक बाब सार्वजनिक करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या