यवतमाळ विधान परिषदेत ‘साहेबराव पॅटर्न’ची एंट्री ? महाविकास आघाडीचा विश्वास कांबळेंवर; उमरखेड-महागावात कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकवेध न्यूज नेटवर्क / २९ मे.

 

महागाव :- 

 

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या साहेबराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जवळपास साहेबराव कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून साहेबराव कांबळे यांनी दिलेली जोरदार लढत आजही मतदारसंघात चर्चेचा विषय आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या त्या निवडणुकीत त्यांना अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी पराभवानंतरही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क तुटू दिला नाही. उलट सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण केली.

सामाजिक, शैक्षणिक तसेच स्थानिक प्रश्नांवर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी मतदारसंघात सक्रियता कायम ठेवली. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची दखल घेत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महाविकास आघाडीचे संख्याबळ आणि कार्यकर्त्यांमधील साहेबराव कांबळे यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता त्यांची उमेदवारी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.

दरम्यान,संभाव्य उमेदवारीच्या चर्चेमुळे उमरखेड,महागावसह संपूर्ण परिसरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून यंदा विधान परिषदेत साहेबराव अशा घोषणांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या