उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला नवे वळण देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवार म्हणून चर्चेत आलेले साहेबराव कांबळे यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मुंबई येथील उपमुख्यमंत्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर साहेबराव कांबळे पुढील राजकीय वाटचाल कोणत्या पक्षासोबत करणार, याबाबत जिल्हाभर उत्सुकता निर्माण झाली होती.अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून त्यांनी शिवसेनेची वाट निवडत समर्थकांसह पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशासाठी उमरखेड-महागाव मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते आणि समर्थक मुंबईत दाखल झाले होते. यामध्ये वरोडी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार मस्के, विजयभाऊ जाधव, विठ्ठल करे, धोडबाराव करे, प्रमोद पिटलेवाड, अशोक माटाळकर तसेच करंजखेड परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
रविवारी झालेल्या या भव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.काँग्रेसच्या संघटनात्मक बळाचा महत्त्वाचा भाग मानले जाणारे साहेबराव कांबळे आणि त्यांचा समर्थक वर्ग शिवसेनेत गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे केवळ पक्षांतर म्हणून न पाहता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीतिक चाल म्हणून पाहिले जात आहे.
उमरखेड-महागाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर सोशल मीडियावर काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून संघटनात्मक फेरबदलांच्या चर्चांनाही वेग आला आहे. साहेबराव कांबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा मोठा गट शिवसेनेत दाखल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचे पडसाद किती उमटतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.