काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झाला. वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही,पक्षात उपेक्षा झाली आणि कोणतीही नोटीस न देता पक्षातून निष्कासित करण्यात आले. या सर्व कारणांमुळेच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेत प्रवेशानंतर प्रथमच उमरखेड येथे आगमन झालेल्या साहेबराव कांबळे यांचे माहेश्वरी चौकात शिवसैनिकांनी बँड, ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गोकुळनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षांतरामागील कारणांचा सविस्तर खुलासा केला.
विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वरिष्ठ नेत्यांनी आवश्यक संख्याबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ते पूर्ण झाले नाही. बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज भरावा लागला आणि अखेरीस माघार घ्यावी लागली. हा आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षहितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व दिले.त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला.वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. प्रेमराव वानखेडे यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कोणतीही नोटीस किंवा स्पष्टीकरणाची संधी न देता पक्षातून निष्कासित करण्यात आले.एखाद्या सामान्य कर्मचाऱ्यालाही सेवेतून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जाते,मात्र माझ्याबाबत पक्षाने ती साधी प्रक्रियाही पाळली नाही,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्षांसह काही स्थानिक नेत्यांवरही गंभीर आरोप केले. बाजार समिती, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अंतर्गत गद्दारीमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.शिवसेनेत प्रवेश हा कोणत्याही पदासाठी किंवा दबावाखाली नसून स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमरखेड मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावागावांत शाखा स्थापन करून प्रत्येक घरात शिवसैनिक तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार परिषदेत साहेबराव कांबळे यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.यावेळी शिवसेना नेते चिंतागराव कदम, प्रविण मिराशे, ॲड. संजय जाधव, रविकांत रुडे, मोहन नाईक, संतोष जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.