आता उपऱ्याला संधी नको… मतं आमची,नेता पण आमचाच हवा! उमरखेड उपविभागात स्थानिक उमेदवारासाठी जोरदार वातावरण; विधान परिषद निवडणुकीत बाहेरच्या चेहऱ्यांना विरोध

लोकवेध न्यूज नेटवर्क / १९ मे.

 

महागाव : – 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अधिकृत घोषणा २५ मे रोजी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरखेड उपविभागात राजकीय हालचालींना वेग आला असून यंदा बाहेरचा नव्हे, तर आपल्या भागातीलच उमेदवार विधान परिषदेत गेला पाहिजे,अशी जोरदार मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांमधून पुढे येत आहे.

उमरखेड उपविभागात मतदान होत असल्यामुळे मतदान केंद्र उमरखेड येथे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.या निवडणुकीत उमरखेड नगरपालिका,ढाणकी नगरपंचायत आणि महागाव नगरपंचायतीतील सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

उमरखेड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह २६ निवडून आलेले सदस्य व ३ स्वीकृत नगरसेवक आहेत.ढाणकी नगरपंचायतीत नगराध्यक्ष,१७ निवडून आलेले सदस्य आणि २ स्वीकृत सदस्य आहेत. तर महागाव नगरपंचायतीत १७ निवडून आलेले सदस्य व २ स्वीकृत सदस्य आहेत.त्यामुळे या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतांचे गणित यावेळी महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१५ नंतर विधान परिषद निवडणुकीचे महत्त्व नगरसेवकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहे. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये बाहेरील भागातील उमेदवारांना संधी देण्यात आली होती. पहिला उमेदवार भूम-परांडा भागातील तर दुसरा नागपूर येथील होता.मात्र निवडणूक संपल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नाही,अशी नाराजी आता उघडपणे व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या वेळी मतं घ्यायची आणि नंतर मतदारसंघ विसरायचा, हे आता चालणार नाही,अशी भावना स्थानिक प्रतिनिधींमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या भागातील, जनतेमध्ये सतत वावरणारा आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारा स्थानिक चेहराच विधान परिषदेत गेला पाहिजे, अशी मागणी अधिक तीव्र होत आहे.

स्थानिक उमेदवार निवडून गेल्यास प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि विभागाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वासही अनेक नगरसेवक व्यक्त करीत आहेत. दरम्यान,विविध राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या हालचाली सुरू केल्या असून पुढील काही दिवसांत निवडणुकीचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे.

या आधी आपण बाहेरच्यांना संधी देऊन पाहिली,परंतु याचे पाहिजे तसे फलित झाले नाही.निवडून आल्यानंतर दोन्ही आमदार मोहदयांनी मतदार संघात भिरकून पाहिले नाही.त्यामुळे आता स्थानिक उमेदवार देण्यात यावा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या