पराभवानंतरही जनतेच्या मनात घर; यवतमाळ विधान परिषदेसाठी साहेबराव कांबळेंच्या नावाची जोरदार चर्चा 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १९ मे.

 

महागाव :- 

 

यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे,जनसंपर्कात सातत्य ठेवणारे नेते साहेबराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सन २०२४ च्या उमरखेड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही त्यांनी खचून न जाता मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी संपर्क कायम ठेवला आहे.

गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे,विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडणे,युवक व शेतकरी वर्गाशी सातत्याने संवाद ठेवणे यामुळे साहेबराव कांबळे यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला नवसंजीवनी दिली आहे.मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा सक्रिय करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

सध्या काँग्रेस पक्षात ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

साहेबराव कांबळे यांच्याकडे जनतेची कामे करणारा हक्काचा नेता म्हणून पाहिले जाते.यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांना यवतमाळ विधान परिषदेवर पाठविण्याची मागणी पुढे आणली आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते,ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क,संघटन कौशल्य आणि सातत्याने जनतेत राहण्याची शैली यामुळे साहेबराव कांबळे हे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेससाठी प्रभावी चेहरा ठरू शकतात.आगामी काळात पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात का,याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या