महागाव बाजार समितीतील सदस्यपद गेलेच; ॲड. गजेंद्र देशमुख यांचे अपीलही नामंजूर

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ जून

 

महागाव :-

 

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य ॲड. गजेंद्र बाळासाहेब देशमुख यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविणाऱ्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशाला विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी कायम ठेवत त्यांचे अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे ॲड. देशमुख यांना मोठा राजकीय व कायदेशीर धक्का बसला असून बाजार समितीच्या राजकारणात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव येथील सदस्यपदासाठी आवश्यक असलेल्या पात्रता व अटींच्या अनुषंगाने ॲड. गजेंद्र देशमुख यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविण्याबाबत प्रकरण दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांनी दि. २२ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे त्यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविले होते.

या आदेशाविरोधात ॲड. देशमुख यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. अपीलमध्ये विविध कायदेशीर मुद्दे उपस्थित करून जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते.

मात्र, संबंधित कायद्याच्या तरतुदी, मूळ प्रकरणातील कागदपत्रे, उपलब्ध नोंदी तसेच दोन्ही पक्षांच्या युक्तिवादाचा सखोल विचार केल्यानंतर अपील प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांचा आदेश कायदेशीर, योग्य व वस्तुस्थितीला धरून असल्याचे नमूद केले. त्यामुळे दि. २२ मे २०२६ रोजीच्या आदेशाद्वारे ॲड. गजेंद्र देशमुख यांचे अपील नामंजूर करण्यात आले असून त्यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविणारा मूळ आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने ॲड. मोहम्मद शहेबाज यांनी कामकाज पाहत प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाला मान्यता देत अपील प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

या निर्णयामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशाला न्यायिक मान्यता मिळाली असून सहकार क्षेत्रात या निकालाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील राजकीय व सहकारी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा शेवट ॲड. गजेंद्र देशमुख यांच्या विरोधात झाल्याने आता बाजार समितीच्या आगामी राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या