कच्च्या रस्त्याचे पक्के बिल ?; लाखो रुपयांच्या रस्ते कामावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ जुलै.

 

महागाव :- 

 

महागाव तालुक्यातील एमडीआर-५२ तिवरंग ते मलकापूर या रस्त्याच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात रस्ता अद्याप कच्चाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे “कच्च्या रस्त्याचे पक्के बिल?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

फलकावरील माहितीनुसार, संबंधित रस्त्याची लांबी ३.१५० कि.मी., कामाची किंमत सुमारे ₹१६२.४२ लाख, तर काम पूर्ण होण्याची तारीख २१ ऑगस्ट २०२५ अशी नमूद आहे. तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीचीही तरतूद असल्याचे दिसून येते.

मात्र, व्हायरल व्हिडिओतील दृश्यांमध्ये रस्ता अनेक ठिकाणी अद्याप मातीचाच असून डांबरीकरण किंवा पक्के काम झाल्याचे स्पष्टपणे दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे संबंधित कामाची गुणवत्ता,निधीचा वापर आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती याबाबत शंका व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

———————————–

ही, बातमी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ व उपलब्ध छायाचित्रांतील माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. संबंधित विभाग किंवा कंत्राटदार यांची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही. ती प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या