ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत शिरफुली व शिरमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शिरफुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सध्या संपूर्ण शाळेची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा घसरत असून वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेता तातडीने आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच शिरमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शिक्षकांची कमतरता कायम असून रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दोन्ही शाळांतील रिक्त पदे भरावीत,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती कॉम्रेड डी. बी.नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिरफुली व शिरमाळ येथील ग्रामस्थांनी जिल्हा मुख्यालयात जाऊन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद,यवतमाळ यांना निवेदन सादर केले.शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.