वाकोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR विशेष शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. नागरिकांना शासकीय प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी आणि कोणतीही अडचण न येता अर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी, या उद्देशाने आयोजित शिबिर यशस्वी ठरले.
शिबिरात समाजसेवक वसीफ खान पठाण यांनी उपस्थित नागरिकांना SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत अर्ज भरणे,आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन केले. तसेच महेश रामशेट्टे यांनीही नागरिकांच्या शंकांचे निरसन करत आवश्यक माहिती दिली.
यावेळी वसीफ भाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नागरिकांना अर्ज भरून देणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे अनेक नागरिकांची कामे एकाच ठिकाणी जलदगतीने पूर्ण झाली.
शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा लोकाभिमुख आणि जनहिताच्या शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असून, सामाजिक सहभागातून जनसेवेचा नवा आदर्श निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.