अतिक्रमणामुळे संरक्षण नाला निष्प्रभ; ५० घरांसह जिल्हा परिषद शाळेवर पुराचा धोका ! २० ते २५ लाखांचा संरक्षण नाला अतिक्रमणाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / ७जुलै.

 

 महागाव :-

 

महागाव तालुक्यातील मौजा सेनद येथे शासनाच्या निधीतून सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला संरक्षण नाला अतिक्रमणामुळे निष्प्रभ ठरत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक मार्गाने वाहून न जाता थेट गावात आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,डोंगर व जंगल परिसरातील पावसाचे पाणी गावात येऊ नये,यासाठी संरक्षण नाल्याची निर्मिती करण्यात आली होती.मात्र नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे विस्कळीत झाला असून प्रत्येक पावसात गावात पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे.या प्रकरणी गावातील रहिवासी मोतीराज गांधी पवार यांनी तहसीलदार, महागाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

विशेष म्हणजे,जिल्हा परिषद शाळेतही पाणी शिरत असल्याची बाब मुख्याध्यापकांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सध्या नाल्याची अवस्था पाहुजाता, आगामी मुसळधार पावसात गावातील ५० ते ६० घरे, जिल्हा परिषद शाळा, सार्वजनिक रस्ता तसेच स्वस्त धान्य दुकान पाण्याखाली जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्यासह जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही.

 

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग,ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने अतिक्रमण हटवून संरक्षण नाल्याची दुरुस्ती करावी,अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी व प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला आहे.शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले संरक्षणात्मक काम अतिक्रमणामुळे निष्प्रभ होत असताना प्रशासनाने वेळीच जागे होऊन ठोस कारवाई करावी,अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या