११ शिक्षक, ५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; फुलसावंगीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! १५ ऑगस्टपासून शाळाबंद आंदोलनाचा इशारा; प्रशासनाला अखेरचा निर्वाणीचा इशारा
११ शिक्षक, ५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; फुलसावंगीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! १५ ऑगस्टपासून शाळाबंद आंदोलनाचा इशारा; प्रशासनाला अखेरचा निर्वाणीचा इशारा
जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, फुलसावंगी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ पासून शाळाबंद करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेसाठी १७ शिक्षकांची पदे मंजूर असताना सध्या केवळ ६ शिक्षक कार्यरत असून ११ पदे रिक्त आहेत. तसेच मंजूर ७ शिक्षकेतर पदांपैकी फक्त २ कर्मचारी कार्यरत असून ५ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून रिक्त पदे न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी हानी होत असून,वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पूर्तता होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.
सन २०२५-२६ च्या समायोजन प्रक्रियेत या शाळेसाठी ४ अतिरिक्त शिक्षक मंजूर करण्यात आले होते.मात्र त्यापैकी फक्त एकच शिक्षक रुजू झाला असून उर्वरित तीन शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत.त्यामुळे रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदे तातडीने भरून उर्वरित मंजूर शिक्षकांना तत्काळ रुजू करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून शाळा बंद ठेवून शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला असून,विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा हा खेळ तातडीने थांबवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.