गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या कलगाव–गुंज मार्गाच्या तातडीने दुरुस्तीची मागणी आता तीव्र झाली असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी सवना, गुंज, कलगाव, वेणी आणि वाकोडी येथील शेकडो नागरिकांनी महागाव तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून या मार्गावर केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असून कायमस्वरूपी रस्त्याच्या उभारणीकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.
महागाव–पुसदला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून, दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्ण जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या मार्गावर साखर कारखाना, सूतगिरणी, आयटीआय महाविद्यालय, विविध शैक्षणिक संस्था, ग्रामीण रुग्णालय तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते.
विशेषतः गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुसद येथे नेताना खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून दर्जेदार रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, आठ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
सवना–वाकोडी मार्गाची प्रचंड दुरावस्था
सवना ते वाकोडी मार्गाची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खड्ड्यांमध्ये हरवला असून, वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, आता रस्त्याच्या प्रश्नावर निर्णायक लढा उभारण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.