शेतकरी-महिलांचा संताप रस्त्यावर; महागावात प्रशासनाविरोधात ‘हाहाकार मोर्चा 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २२ 

 

महागाव :- 

 

तालुक्यातील शेतकरी, महिला आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महागाव येथे जनआक्रोश उसळला.जन आंदोलन आधार संघर्ष समिती च्या वतीने काढण्यात आलेल्या हाहाकार मोर्चा’ने संपूर्ण शहर दणाणून सोडले.संतप्त शेतकरी आणि महिलांनी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकवला.

 

पीकविमा,अवैध दारू विक्री,खतांचा काळाबाजार,घरकुल योजना,पांदण रस्ते आदी मूलभूत प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला होता.समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,घरकुल लाभार्थी महिला आणि विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचे फलक गळ्यात अडकवून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.सरसकट पीकविमा मंजूर करा,बोगस खत-बियाण्यांची चौकशी करा, दारूबंदी लागू करा,घरकुल लाभार्थ्यांना न्याय द्या,अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मोर्चादरम्यान जगदीश नरवाडे यांनी प्रशासनावर सडकून टीका करत, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. 

 

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मंजूर करावा,कृषी विभागाने बोगस खत,बियाणे व औषधांच्या विक्रीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ‘लाडकी बहीण’योजनेचा लाभ महिलांना विनाअडथळा मिळावा, गावागावात दारूबंदी लागू करावी, घरकुल आणि पांदण रस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत तसेच कलगाव येथील स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

नायब तहसीलदार गजानन पराते,गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम,पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी संबंधित विभागांची निवेदने स्वीकारली.

 

या हाहाकार मोर्चात नागोराव पाटील कदम,गोविंद देशमुख,संजय गरुड, मंगेश पाटील वानखेडे,स्वप्निल नरवाडे, आकाश चव्हाण,अमोल चंदापुरे, अमोल वानखेडे,ओम कुसुंगवार, बापूराव देशमुख,दिलीप सुरोशे, केदार जोशी,दादाराव ठाकरे,दिगंबर गाडबैले यांच्यासह सुवर्णा देशमुख, देवका राठोड, मेहजबिन पठाण आणि तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या