गुरुकृपेचा महिमा अन् भक्तीचा महासागर ! अंबाळी बाराखिंडी दत्तात्रय प्रभू देवस्थानात १७ वा अधिकमास पंचावतार उपहार व अन्नदान महोत्सव भक्तिभावात संपन्न

लोकवेध न्यूज नेटवर्क / २० मे.

उमरखेड :- 

 

॥ सर्वज्ञ कृपा ॥ या मंगलमय घोषात आणि अखंड गुरुभक्तीच्या वातावरणात विदर्भातील प्रसिद्ध अंबाळी बाराखिंडी दत्तात्रय प्रभू महानुभावपंथ देवस्थान येथे १७ वा अधिकमास पंचावतार उपहार व अन्नदान महोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. बुलडाणा जिल्ह्यातील या पवित्र तीर्थक्षेत्री तब्बल पाचशेहून अधिक भाविक-भक्तांनी उपस्थित राहून भक्ती, सेवा आणि नामस्मरणाचा अनोखा संगम अनुभवला.

 

अकरा दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात नामस्मरण,अन्नदान, प्रवचन, भक्तिसोहळे तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, २० मे रोजी भक्तिमय वातावरणात या सोहळ्याची सांगता करण्यात आली. संपूर्ण परिसर जय दत्त, हरिनाम आणि गुरुभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

या धार्मिक उपक्रमाची प्रेरणा मम गुरुवर्य कै. प.पू. प.म. संदीपान बाबा बेलापूरकर यांच्या आध्यात्मिक विचारांतून मिळाली होती. परमेश्वरावरील त्यांची अपार श्रद्धा आणि समाजसेवेची भावना यामुळे सलग १६ वर्षे हा महोत्सव अखंड सुरू राहिला. हा सोहळा २१ वर्षे सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस होता.मात्र अचानक त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर त्यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिष्य परिवाराने स्वीकारली. त्याच भावनेतून यंदाचा १७ वा महोत्सव उत्साहात पार पडला.

या सोहळ्यासाठी प.पू. महंत विश्वनाथ बाबा कोठी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी स्वतः पुढाकार घेत शिष्य परिवाराला धीर देत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. गोकुळाई तेल्हारकर, मंगलाई कोठी तसेच विविध स्तरांवरील प्रमुख शिष्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन देशमुख, मनीषा देशमुख, युवराज पाटील साकळी (बुद्रुक), सेवगा, चिखली मळगाव तसेच संपूर्ण शिव परिवार आणि अनेक सेवाभावी व्यक्तींनी विशेष योगदान दिले. पुढील सर्व धार्मिक कार्यक्रम महंत विश्वनाथ बाबा कोठी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेष म्हणजे, महिला भगिनींना साडी-चोळीचा आहेर देण्यात आला. तसेच धोंडे, पुरणपोळी आणि रसयुक्त मिष्ठान्न भोजनाचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. भक्तांच्या सेवेतूनच परमेश्वराची सेवा घडते, याचा प्रत्यय या महोत्सवातून भाविकांना आला.

सदर कार्यक्रम देवस्थानाचे उपाध्यक्ष भीमराव पाटील चंद्रवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या