फूट पाडण्याचा डाव ओळखा, संघटित राहा’; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनीष जाधव यांचा पाठिंबा ‘न्याय, हक्क आणि अधिकार मिळेपर्यंत संघर्ष करा’; शासनाच्या धोरणावर सडकून टीका
फूट पाडण्याचा डाव ओळखा, संघटित राहा’; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनीष जाधव यांचा पाठिंबा ‘न्याय, हक्क आणि अधिकार मिळेपर्यंत संघर्ष करा’; शासनाच्या धोरणावर सडकून टीका
आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सत्ताधारी शासनाकडून होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील एकजूट कायम ठेवून अशा डावपेचांना वेळीच हाणून पाडावे आणि न्याय, हक्क व अधिकार मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले.
यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या १५ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी आंदोलन व उपोषण सुरू आहे.या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करताना जाधव बोलत होते.
जाधव पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात वेळप्रसंगी संघर्ष करावाच लागतो. शोषणमुक्त व्यवस्थेसाठी राज्यभरात आदिवासी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनातून निर्माण झालेली ऐतिहासिक एकजूट ही प्रस्थापित व्यवस्थेला दिलेली चपराक आहे.या एकजुटीमुळे शासनावर दबाव निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांनी संघटितपणे आपला लढा पुढे नेला पाहिजे.
यावेळी त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या कारभारावरही तीव्र शब्दांत टीका केली.आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत,आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.आश्रमशाळांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील आश्रमशाळांबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. राजकीय नेत्यांच्या आश्रमशाळा कथितरीत्या शोषणाची केंद्रे बनत असल्याचा आरोप करत, या व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक निष्पाप बालकांना जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांनी शासनाकडे नऊ प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यापैकी केवळ पाच मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. उर्वरित मागण्याही तातडीने निकाली काढाव्यात, तसेच वाढलेला पदभरतीचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जाधव यांनी केली. या प्रश्नांची मुख्यमंत्री स्तरावर तातडीने दखल घेण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘मागण्याने भीक मिळते, अधिकार मिळत नाहीत’, या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन देणारे पत्रही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.यावेळी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तसेच योगेश मडावी, गेडाम, समीर, शुभम जयस्वाल, विशाल पवार, प्रवीण पवार यांच्यासह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.