महागाव तहसील कार्यालयात सोमवारी एक अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळाले.शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला ‘हायातीचा पुरावा’ सादर करण्यासाठी तालुक्यातील अनेक वयोवृद्ध नागरिक तहसील कार्यालयात दाखल झाले होते.वाढते वय, अशक्तपणा आणि शारीरिक मर्यादा असूनही केवळ ‘मी जिवंत आहे’ हे सिद्ध करण्यासाठी वृद्धांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
गावपातळीवर हायातीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या तरी अनेक नागरिक अजूनही थेट तहसील कार्यालयात येत आहेत. परिणामी दररोज वृद्ध नागरिकांची गर्दी होत असून अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामुळे महसुली सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रत्यक्षात अनेक नागरिकांना या सुविधांची पुरेशी माहिती नसल्याने किंवा स्थानिक पातळीवर काम होईल याबाबत विश्वास नसल्याने ते तहसील कार्यालयातच धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता हायाती पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ करणे, गावपातळीवर विशेष शिबिरे आयोजित करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्याची मागणी होत आहे.
———————————–
महागाव तहसील कार्यालयात हायातीचा पुरावा सादर करण्यासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक. आधार घेत पायऱ्या चढणारे वृद्ध आणि कामाच्या प्रतीक्षेत बसलेले नागरिक हे दृश्य शासनाच्या दारात वृद्धांची होत असलेली परवड अधोरेखित करत आहे.