मुंबईतील काही प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवर झालेल्या संयुक्त कारवाईनंतर अन्न सुरक्षा विभागाने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) खाद्यपदार्थांचे पॅकिंग किंवा सादरीकरण करण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात,असे विभागाने स्पष्ट केले आहे. वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध प्रकारचे रासायनिक रंग, रंगद्रव्ये, बाइंडर्स तसेच शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असतो. हे घटक थेट अन्नपदार्थांमध्ये मिसळण्याची शक्यता असल्याने दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
तसेच वर्तमानपत्रांचे वितरण, वाहतूक आणि हाताळणीदरम्यान त्यांच्यावर धूळ, घाण आणि विविध प्रकारचे रोगकारक जंतू साचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कागदात गुंडाळलेले अन्न खाल्ल्यास अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशाराही एफडीएने दिला आहे.
विशेषतः वडापाव, भजी, समोसे, फरसाण तसेच इतर गरम खाद्यपदार्थांसाठी वर्तमानपत्राचा वापर टाळण्याचे आदेश देण्यात आले असून विक्रेत्यांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अन्नसुरक्षेला प्राधान्य देत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.