ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राष्ट्रीय सैनिक संस्था करत आहे – माजी आमदार राजेंद्र नजरधने

लोकवेध न्यूज नेटवर्क / दि. ११ जून.

 

पुसद :- 

 

राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सैनिक संस्था विदर्भ प्रांताचे भव्य अधिवेशन पुसद येथील पार्थ सेलिब्रेशन हॉलमध्ये उत्साहपूर्ण व देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. विदर्भातील विविध जिल्ह्यांतील माजी सैनिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे शाल व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. विदर्भ प्रांत सचिव प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विदर्भातील संघटनात्मक उपक्रम व आगामी नियोजनाची माहिती दिली.

राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिश्चंद्र राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, आपत्ती व्यवस्थापन आणि युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याची गरज अधोरेखित केली. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राष्ट्रीय सैनिक संस्था करत असल्याचे सांगितले. युवकांना योग्य दिशा देऊन राष्ट्रहिताची जाणीव निर्माण करण्यासाठी संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य सचिव जनार्दन गो. पाटील यांनी संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले, तर विदर्भ प्रांत अध्यक्ष अभयकुमार गुप्ता यांनी संघटनेच्या विदर्भातील कार्याचा आढावा सादर केला.

अधिवेशनातील विशेष आकर्षण म्हणजे सैनिकांच्या वीरमातांचा व वीर पत्नींचा करण्यात आलेला सन्मान. माधुरी जगताप, एकता धूळधुळे, वैशाली सोडगीर आणि अल्का राठोड यांचा शाल व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच समाजसेवा, पर्यावरण, शिक्षण आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शांतीकुमार इंगोले, प्रकाश वानरे आणि ऋषिकेश टनमने यांचा सन्मान करण्यात आला.

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, मिशन ग्रीन पुसद, संवेदना सोशल फाउंडेशन, शिवप्रभा ट्रस्ट आणि वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, कारंजा या संस्थांनाही समाजोपयोगी कार्याबद्दल गौरविण्यात आले. माजी सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

आजची युवा पिढी नैराश्य व व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त करत, सुदृढ, सशक्त आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेली युवा पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सैनिक संस्था विविध उपक्रमांद्वारे कार्यरत असल्याचा संदेश अधिवेशनातून देण्यात आला.

अधिवेशनानंतर राष्ट्रीय सैनिक संस्था विदर्भ प्रांत सचिव कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे विदर्भातील संघटनात्मक आणि समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रगीत आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या