एका घरात दुहेरी मानाचा तुरा! कृषी भूषणांच्या कुटुंबातील बापूजी पारवेकर यांना ‘लाल परी गौरव रत्न’ पुरस्कार निष्ठावान सेवेला राज्यस्तरीय गौरव; महागावच्या पारवेकर परिवाराचा वाढला मान

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०६ जून.

 

महागाव :- 

 

कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे ओळख निर्माण करणाऱ्या पारवेकर परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त महागाव येथील तथा उमरखेड आगारातील वाहतूक नियंत्रक बापूजी पारवेकर यांना मुंबई येथे प्रतिष्ठेचा ‘लाल परी गौरव रत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कृषी भूषण पुरस्कार विजेत्या लक्ष्मी ताई पारवेकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. आता त्याच कुटुंबातील बापूजी पारवेकर यांना परिवहन क्षेत्रातील निष्ठावान आणि समर्पित सेवेसाठी मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळात दीर्घकाळ कर्तव्यदक्षपणे सेवा बजावताना त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि सेवाभाव यांचा आदर्श कायम ठेवला. त्यांच्या या कार्याची दखल घेत महामंडळाने त्यांना ‘लाल परी गौरव रत्न पुरस्कार’ देऊन गौरविले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बापूजी पारवेकर यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून संपूर्ण उमरखेड आगार परिवाराचा असल्याची भावना व्यक्त केली. “या पुरस्काराचे खरे मानकरी विभाग नियंत्रक अमृत कचवे, आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके, चालक-वाहक बंधू, मेकॅनिकल स्टाफ, ट्रॅफिक कर्मचारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळेच मला हा सन्मान मिळाला,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या गौरवाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नगरसेविका जयश्री संजय नरवाडे आणि संजय विजय नरवाडे यांनीही त्यांचे अभिनंदन करताना, हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित सेवाकार्याचा योग्य गौरव असल्याचे म्हटले आहे.

एका घरातील दोन कर्तृत्ववान व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश हे केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण महागावसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. एकाने शेतीतून मान मिळवला, तर दुसऱ्याने सेवेतून सन्मान मिळवत कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाचाच विजय पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या