गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ महागावतर्फे १२५ विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ महागावतर्फे १२५ विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक हा, संदेश देत मराठा सेवा संघ महागाव तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य गुणगौरव सोहळा मातोश्री विद्यालय,महागाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील १२५ गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनस्थानी महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम होते,तर अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी उपस्थिती लावली.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.अरुण पाटील तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आशिष गावंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि जिजाऊ वंदनेने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुरुषोत्तमजी खेडेकर लिखित मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला काय दिले ?ही पुस्तिका देऊन करण्यात आले.
यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२६ मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा घाटंजी येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
एकूण १२५ गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना गौरवपत्र,शिवधर्म दिनदर्शिका,पुष्पगुच्छ व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या यशामुळे कार्यक्रमस्थळी अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांवर चालत जीवनात मोठे ध्येय गाठण्याचे आवाहन केले.मराठा सेवा संघाचा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, जिद्द आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. संस्कारामुळे आलेली श्रीमंती टिकते; संस्काराशिवाय आलेली श्रीमंती विकाऊ ठरते,या त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरित केले.
या यशस्वी आयोजनासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव डॉ.संदीप शिंदे, सहसचिव अमोल जगताप, तालुकाध्यक्ष उदयभाऊ नरवाडे, तालुका सचिव पंकज देशमुख,चतुर्वेद अडकिने, स्वप्निल नरवाडे, तेजस नरवाडे, मंगेश पाटील वानखेडे तसेच अमोल शिंदे,रवी भांगे,विजय कदम, अंकुश शिंदे आणि किशोर सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले.