एकाच छताखाली जनतेच्या प्रश्नांना दिलासा; महाराजस्व शिबिरात शेकडोंची गर्दी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठीच महाराजस्व अभियान; तहसीलदार अभय मस्के

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ मे.
महागाव :-
महागाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात हजारो लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना तहसीलदार अभय मस्के यांनी सांगितले की,विविध कारणांमुळे सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. मात्र महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले महाराजस्व समाधान शिबिर हे,जनतेसाठी अत्यंत उपयुक्त अभियान ठरत आहे.एकाच छताखाली १६ ते १७ विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावत आहेत.या अभिनव उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिराला विभागाचे आमदार किसनराव वानखेडे,भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा,ज्येष्ठ नेते संभाजीराव नरवाडे,नगराध्यक्ष रंजनाताई आडे, उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,नायब तहसीलदार गजानन पराते,वैभव पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय खिल्लारे, वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, उपाधीक्षक भूमी अभिलेख कलावती जाधव, सहकारी अधिकारी एस.एस. पिंपरखेडे, दुय्यम निबंधक गजानन घंदारे, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी अमित झा, पत्रकार निलेश नरवाडे, महिला बालकल्याण विभागाच्या सुपरवायझर चंद्रकला गजभिये, शकुंतला इंगोले, मंडळ अधिकारी मारोती एकुलवार, सचिन फटाले, बाळासाहेब माने, गोविंद ठाकरे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नायब तहसीलदार गजानन पराते, वैभव पवार, आरोग्य विभागाचे जळकुटे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी विजय खिल्लारे यांनी विविध योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.
नगरसेविका जयश्री नरवाडे यांनी शासनाच्या सेवा केवळ शिबिरापुरत्या मर्यादित न राहता प्रशासनाने रोज कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांची कामे तत्परतेने करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्या म्हणाल्या.आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर चव्हाण यांनी केले.
———————————–
५ हजार ७९३ लाभार्थ्यांना थेट लाभ
महाराजस्व समाधान शिबिरातून तब्बल ५ हजार ७९३ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता.
राशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, संजय गांधी योजना, विद्यार्थ्यांचे विविध दाखले, सातबारा, फेरफार, कर्ज वितरण प्रमाणपत्र, रमाई घरकुल अनुदान, पांदण रस्त्यांचे प्रश्न अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
———————————————-
१ कोटी ४२ लाखांच्या पीक कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण
सहकारी सोसायटी अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना १ कोटी ४२ लाख ६१ हजार रुपयांच्या पीक कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना मंचावर सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देण्यात आले.
———————————————-
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शिबिराचे नेटके नियोजन
महागाव महसूल मंडळाच्या वतीने आयोजित या महाराजस्व समाधान शिबिराचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पाच हजार चौरस फूट मंडप उभारून वातानुकूलित सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.यावेळी महागाव तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

