सवन्याच्या सर्वेश्वरचा लातूरमध्ये ‘१०० पैकी १०० ’चा करिष्मा दहावीच्या प्रत्येक विषयात शंभर गुण; महागाव तालुक्याच्या नावाला मिळवून दिला मानाचा तुरा

लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ मे.
महागाव :-
महागाव तालुक्यातील सवना गावच्या सर्वेश्वर गोविंदराव देशमुख या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवत संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. लातूर येथील आर. एन. मोटेगावकर विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्वेश्वरने प्रत्येक विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवत ‘परफेक्ट १००’ची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
लातूरसारख्या अत्यंत स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सर्वेश्वरने महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत नवा शैक्षणिक आदर्श निर्माण केला आहे.
सर्वेश्वरचे वडील गोविंदराव देशमुख हे सवना येथील श्री शिवाजी बी.सी. वसतीगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. साध्या शेतकरी कुटुंबातील सर्वेश्वरला आई-वडिलांनी शिक्षणाची प्रेरणा, शिस्त आणि मेहनतीचे संस्कार दिले. त्याच संस्कारांच्या बळावर त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केले. “आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित अभ्यासामुळेच हे यश शक्य झाले,” अशी भावना व्यक्त करत सर्वेश्वरने आपले यश आई-वडिलांना समर्पित केले.
सध्या महागाव तालुक्यासह परिसरात सर्वेश्वरच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून गावकरी, मित्रपरिवार आणि स्नेही मंडळींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अनेक ठिकाणी सर्वेश्वर तसेच त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी ठरत आहे.

