विशेष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; कल्पतरू विशेष शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात

लोकवेध न्यूज नेटवर्क / २ जुलै.

 

नागपूर,बूटीबोरी :

 

संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बूटीबोरी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेमळ वातावरणात स्वागत करण्यात आले.पुष्पगुच्छ, टाळ्यांचा गजर आणि हसतमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत करत नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने,आनंदी चेहऱ्यांनी आणि उत्साहाने बहरून गेली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरित केले.आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आनंदी वातावरणात शिक्षणाचा प्रवास सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

 

प्रत्येक विशेष विद्यार्थ्यामध्ये दडलेल्या गुणांना योग्य दिशा देणे,त्यांच्यामध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीवा विकसित करणे हेच शाळेचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचा संपूर्ण शिक्षकवृंद कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या स्वागत समारंभामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.नवीन शैक्षणिक वर्ष प्रत्येक विशेष विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, प्रगती, आत्मविश्वास आणि यशाची नवी दालने खुली करो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रत्येक विशेष मूल हे ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांची प्रत्येक पाऊलवाट यशाकडे वाटचाल करते,हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या