वादावर पडदा; दिंडाळा शाळेची ‘आदर्श’कडे दमदार वाटचाल सुरू !

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ एप्रिल
उमरखेड :-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिंडाळा येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षकांमधील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, शाळेत पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या शिक्षकाची झरी-झामणी येथे बदली झाल्यानंतर शाळेतील तणाव निवळला आहे.
शाळेत अंतर्गत मतभेद, छळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण ढवळून निघाले होते. या घडामोडींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची तीव्र चिंता पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असून गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वाद संपल्यानंतर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गावकरी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी एकत्र येत शाळेची गुणवत्ता उंचावण्याचा संकल्प केला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम सुविधा आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
दिंडाळा शाळेची घसरलेली प्रतिमा पुन्हा उंचावून तिला तालुक्यातील ‘आदर्श शाळा’ बनवण्याचा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता वाढवणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
“गावातील सर्वजण एकत्र येऊन शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू,” असा विश्वास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल राठोड यांनी व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग जाधव म्हणाले, “दिंडाळा शाळा नव्या उमेदीने उभी राहील. उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आदर्श ठरेल आणि विद्यार्थ्यांची प्रगती निश्चितच गगनभरारी घेईल.”
