अडीच हेक्टरमधील वृक्ष जळून खाक; ‘पालापाचोळा’ अहवाल देत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली ?

लोकवेध न्यूज नेटवर्क / २७ एप्रिल

महागाव (जि. यवतमाळ)

महागाव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्रात पिंपळगाव – सारकिनी परिसरात सुमारे दोन ते अडीच हेक्टर क्षेत्रातील वृक्ष आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंदाजे दहा दिवसांपूर्वी घडल्याची विश्वसनीय माहिती मिळत असून, यामुळे वन विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य शासनाने २०१६-१७ पासून ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवून वृक्ष लागवडीवर मोठ्याप्रमाणात भर दिला असून यावर कोट्यवधीचा निधी खर्च केला होता.
दरम्यान पुढे ही मोहीम ५० कोटी वृक्ष लागवडीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.मात्र, महागाव तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, संबंधित वनपरिक्षेत्रात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वृक्षांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात असंख्य झाडे जळून खाक झाल्याचे सांगितले जात असताना, अधिकाऱ्यांनी मात्र “केवळ पालापाचोळा जळाला” असा अहवाल सादर केल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे घटनेचे गांभीर्य जाणीवपूर्वक कमी दाखवले गेले का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या, संदर्भात सहाय्यक वनसंरक्षक शशांक कदम यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले दोन अडीच हेक्टरवरील वन क्षेत्रांतील पाला- पाचोळा जाळला असल्याचा काळी दौलत खान वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी अहवाल सादर केल्याची माहिती दिली .

प्रत्यक्षदर्शी पाहता घटनेचे स्वरूप लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहेत.यामुळे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, राऊंड ऑफिसर आणि वनरक्षक यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

जसे छोट्या बाळाचे एक आई संगोपन करते त्याच्याप्रमाणे वृक्ष लागवडीनंतर वृक्षांना नियमित पाणी देणे, तण काढणे, कुंपण करणे, मृत झाडांच्या जागी नवीन रोपे लावणे, खत देणे आणि वाढीवर लक्ष ठेवणे ही जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असते. मात्र, या सर्व बाबी केवळ कागदोपत्री पूर्ण करून प्रत्यक्षात दुर्लक्ष केल्याची शक्यता स्थानिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे मेश्राम यांच्या कार्य काळात वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या कामावर,शासनाच्या निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, वृक्ष लागवडीच्या नावाखाली अनियमितता झाल्याचा आरोप पुढे येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जळालेल्या क्षेत्राचा प्रत्यक्ष पंचनामा व अहवाल सार्वजनिक करावा,अशी जनभावना आहे.

महागाव तालुक्यातील या घटनेमुळे केवळ वृक्षांचे नुकसान झाले नसून शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरील विश्वासही डळमळीत झाल्याचे चित्र आहे.आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या