दत्तभक्तीचा दीप मालवला… महंत मधुसूदन भारती महाराज यांना देवाज्ञ; माहूरसह संपूर्ण परिसर शोकसागरात”

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०५
माहूर :-
माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे पूज्य महंत मधुसूदन भारती महाराज (वय ९५) यांना शनिवारी दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजून काही मिनिटांनी देवाज्ञा झाली.त्यांच्या निधनाने माहूरसह यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांवर शोककळा पसरली आहे.
मधुसूदन भारती महाराज यांनी आपल्या आयुष्यभर दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवा यासाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच त्यांची महानता दडलेली होती. त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना जीवनाची दिशा मिळाली.
सन १९८७ मध्ये संस्थानच्या धार्मिक परंपरेनुसार ते गादीवर विराजमान झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी श्री दत्त शिखर संस्थानच्या गौरवशाली परंपरा जपत भाविकांच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन अर्पण केले. संस्थानचा विकास, तसेच भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
माहूरगड आणि दत्त शिखराची परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने जोपासली. ते अध्यात्म, सेवा आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाविकांनी माहूरगडाकडे धाव घेत अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराजांच्या जाण्याने दत्तसंप्रदायातील एक तेजस्वी अध्याय संपला असून, त्यांच्या स्मृती आणि कार्य भाविकांच्या हृदयात सदैव जिवंतराहतील.
