लोकवेध न्युज नेटवर्क / १३ मार्च
महागाव : –
प्रलंबित वादविवादांचा सामंजस्यातून तोडगा काढण्याची संधी नागरिकांना पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. शनिवार,१४ मार्च २०२६ रोजी महागाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून हे आयोजन डिस्टिक लिगल सर्विस अथॉरिटी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
या लोकअदालतीत तालुक्यातील तडजोडपात्र सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणे,फौजदारीतील प्रलंबित खटले तसेच दाखलपूर्व वाद सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा वेळ,खर्च आणि मानसिक ताण कमी करून वादांचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी लोकअदालत प्रभावी पर्याय ठरत असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.
तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क स्तर) एस. आर. जैन यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, परस्पर सामंजस्यातून न्याय देणे हे लोकअदालतीचे मूलभूत उद्दिष्ट आहे. अधिकाधिक तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीत ठेवून ती जलदगतीने निकाली काढावीत, असे त्यांनी नमूद केले.
लोकअदालतीसाठी प्रकरणे नोंदवू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी महागाव न्यायालयाशी संपर्क साधावा. सहायक अधीक्षक एस. एस. तळेगांवकर, तालुका विधी सेवा समितीचे लिपिक मोहम्मद अजिम खालेख किंवा संबंधित वकिलांकडे आवश्यक माहिती व कागदपत्रांसह नोंदणी करता येणार आहे.
लोकअदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे मार्गी लागू शकतात. त्यामुळे या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
