बसस्थानक इमारत बांधकामात मोठी अनियमितता ? नाल्याच्या रेतीचा वापर, पाणी न मारल्याने धुळीचा त्रास; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

लोकवेध न्युज नेटवर्क / १२ मार्च
महागाव :
महागाव येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे सुरू असलेले बांधकाम सध्या विविध अनियमिततेमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या बांधकामामध्ये दर्जेदार साहित्याऐवजी नाल्यातील रेतीचा वापर केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी नियमित पाणी न मारल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानक परिसरात दररोज एस.टी. बसमधून उतर-चढ करणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धूळ थांबवण्यासाठी नियमानुसार दररोज पाणी मारणे आवश्यक असताना त्या नियमांचे पालन होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बांधकाम क्षेत्रातील नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कामांदरम्यान धूळ कमी करण्यासाठी नियमित पाणी मारणे, दर्जेदार व प्रमाणित साहित्याचा वापर करणे तसेच सुरक्षिततेचे सर्व निकष पाळणे बंधनकारक असते. मात्र या बसस्थानकाच्या इमारतीच्या कामात या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाल्यातील रेतीचा वापर केल्यास बांधकामाची गुणवत्ता कमी होते आणि इमारतीचे आयुष्यही कमी राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्याचा वापर केल्यास भविष्यात इमारतीच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
दरम्यान, या कामावर देखरेख करणारे संबंधित अधिकारी या अनियमिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. बांधकामातील नियमबाह्य प्रकारांबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बसस्थानक हे सार्वजनिक वापराचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून नियमांनुसार दर्जेदार बांधकाम करावे, तसेच परिसरात नियमित पाणी मारून धूळ कमी करावी, अशी मागणी नागरिक व प्रवासी करीत आहेत.
