कर्जमाफीचा सवाल तापला;अन्यथा ‘अन्नत्याग आंदोलन’ तीव्र करण्याचा इशारा 

लोकवेध न्युज नेटवर्क / १९ मार्च 

महागाव :- 

 

राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर होत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी योजनेत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत असून,अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांकडून देण्यात आला आहे.

२०२६ – २७ च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी पीक कर्जमाफी योजनेत बदल करण्यासाठी ज्येष्ठ शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत असलेल्या सर्व पीक कर्जाची संपूर्ण माफी करून ७ / १२ कोरा करावा, तसेच ५ लाख रुपयांपर्यंतच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचाही समावेश करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.पाइपलाइन, ई-मोटार,बोअरवेल व ठिबक सिंचनासाठी घेतलेल्या कर्जालाही या योजनेत समाविष्ट करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यासोबतच सोयाबीन, कापूस, हरभरा व धान पिकांसाठी उत्पादन खर्चावर आधारित भावांतर योजना प्रभावीपणे राबवावी, तसेच दुधाला प्रति लिटर ५ रुपयांची दरवाढ देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान,सध्याच्या परिस्थितीत उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक नैराश्यातून शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या घटनेला स्मरून त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या आंदोलनात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकरी प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत,या आत्महत्या नसून व्यवस्थेची हत्या आहे,असा तीव्र आरोप शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात,अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही,तर राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या