कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा इशारा; २७ एप्रिलपासून महागाव तालुक्यात बेमुदत बंद आंदोलन

 


लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ एप्रिल

राज्यातील प्रलंबित अडचणींकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महागाव तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत “बी-बियाणे व कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद” आंदोलन पुकारले आहे. महागाव तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने याबाबत घोषणा केली आहे.

तालुक्यातील कृषी केंद्र चालकांना भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. कंपन्यांकडून रासायनिक खतांचा अपुरा पुरवठा, बेकायदेशीर लिंकिंग पद्धती, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित बियाण्यांची विक्री, तसेच एसटीबीटी कंपनीशी संबंधित बियाण्यांचे प्रलंबित प्रश्न या प्रमुख अडचणी असल्याचे सांगण्यात आले.

या समस्यांमुळे विक्रेत्यांचा व्यवसाय अडचणीत आला असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या संदर्भात दि. २४ एप्रिल रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती महागाव येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध मार्केटमधील अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

मागण्या मान्य न झाल्यास २७ एप्रिलपासून तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे पेरणी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या