मतदार यादीतील घोळामुळे ‘आडवी बाटली’ला धक्का; महिलांचा निकालावर जोरदार आक्षेप

लोकवेध न्यूज नेटवर्क

 महागाव :- 

 महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये देशी दारूचे दुकान व वाईन बार हटविण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्या निकालावर महिला मतदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मतदान प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत महिलांनी निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महिलांच्या तक्रारीनुसार, १६ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले कन्या महाविद्यालयात ‘आडवी बाटली’ या चिन्हासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.मयत मतदारांची ५ मते वजा करून १४० मते ग्राह्य धरण्यात आली. मात्र,मतदार यादीत दोन महिला मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आणून देऊनही ती वजा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तसेच,मुख्याधिकाऱ्यांनी त्रुटीपूर्ण मतदार यादीच मतदानासाठी वापरल्याचा आरोप महिलांनी केला आहे. संबंधित नावे वजा केल्यास एकूण मतदारसंख्या १३८ धरली जावी, असे महिलांचे म्हणणे आहे.

याशिवाय, एका महिला मतदाराने अधिकृत शिक्का न मारता अंगठ्याचा ठसा उमटविल्याची बाब समोर आली आहे. हा ठसा ‘आडवी बाटली’च्या चिन्हासमोर असल्याने ते मत वैध धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अज्ञानामुळे पद्धत चुकीची वापरली असली,तरी मतदाराची भूमिका स्पष्ट असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

महिला मतदारांच्या मते,एकूण ७७ मतदानांपैकी ७०मते ‘आडवी बाटली’च्या बाजूने पडली आहेत.त्यामुळे निकाल जाहीर करताना या सर्व बाबींचा विचार करून न्याय्य निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मतदान केंद्रावर लेखी आक्षेप नोंदविण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोपही महिलांनी केला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तोडगा काढावा,अशी मागणी छाया नरवाडे, संजिवनी भेंडे,बेबीताई गाडबैले, सुप्रिया गाडबैले,सविता रुणवाल, कविता नेवारे,कविता अमिलकंठवार, संगिता अमिलकंठवार, पुनम अमिलकंठवार, स्नेहल अमिलकंठवार, नाजनिन पारेख, महेविश पारेख व वंदना पानपट्टे आदी महिला मतदारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या