८ महिन्यांपासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अखेर जेरबंद; यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची शिताफीपूर्ण कारवाई

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ एप्रिल २०२६

 

पुसद :- 

 

वसंतनगर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणे तसेच गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी पथकांना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या

दि. २४ एप्रिल रोजी पुसद उपविभागात फरार आरोपींचा शोध घेत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी मोहम्मद आवेज ऊर्फ तिड्डा मोहम्मद नजीर (वय २७, रा. पार्वती नगर, पुसद) हा गायमुखनगर रोड परिसरात फिरत आहे. त्यानुसार पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत कौशल्यपूर्ण सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

सदर आरोपी हा वसंतनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २८०/२०२५ मधील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मागील वर्षापासून फरार होता. खात्री झाल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या