पैशांच्या वादाचा रक्तरंजित शेवट; बोथा येथे ७५ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून, दोघे आरोपी ताब्यात

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ एप्रिल

महागाव :-

बोथा (सा) येथे पैशांची देवाण-घेवाण आणि ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धाची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी दोन आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे

मृत व्यक्तीचे नाव दौलत रामा गव्हाणे (वय ७५, रा. बोथा) असे असून ते एकटेच राहत होते. त्यांचे नातू रजनीश कैलास गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी परमेश्वर साहेबराव मोरे (वय ३०) याने दौलत गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे वापरण्यास घेतली होती. याशिवाय वेळोवेळी रोख रक्कमही घेतली होती. या व्यवहारातूनच मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद पेटला होता.

दरम्यान दि. २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घटनां घडली. पोफाळी पोलिसांना या संदर्भात मूर्तकच्या नाथ लगाने आणि पोलिस पाटलाने माहिती दिली असता कोणताही विलंब न करता पोलीस घटनास्थळी पोहोचले.दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. घरात प्रवेश करताच दौलत गव्हाणे हे खाटेवर मृतावस्थेत आढळले. पुढील तपासणीदरम्यान घराच्या आतील खोलीत लपून बसलेले परमेश्वर मोरे आणि विनोद कोंडबा गव्हाणे (वय २५) हे दोघे सापडले.

मृत गव्हाणे यांनी पैसे आणि ट्रॅक्टरची अवजारे परत करण्यासाठी तगादा लावल्याने आरोपी चिडले होते. याच रागातून दोघांनी संगनमत करून रात्री ९ ते १०:३० दरम्यान तोंड व गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
गव्हाणे यांना तातडीने पुसद येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोफाळी पोलिस करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या