दिंडाळा शाळेत शिक्षकांचा वाद टोकाला; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, छळ-भ्रष्टाचाराचे आरोप

लोकवेध न्यूज नेटवर्क / २० एप्रिल
उमरखेड (जि. यवतमाळ)
जि.प.उ.प्रा. शाळा दिंडाळा येथे शिक्षकांमधील असमन्वय आणि वाढता वाद यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडले असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे चित्र आहे. छळ व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
शिक्षक गजानन गोपेवाड यांनी मुख्याध्यापक सिद्धार्थ दवणे व काही शिक्षकांवर मानसिक छळ,दबाव आणि अन्याय केल्याचा आरोप केला आहे. तक्रार करूनही उलट आपल्यालाच त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, शाळेतील काही गैरप्रकारांचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या शिक्षकांवर जबरदस्तीने रजा देणे, पगार रोखणे, बदलीचा दबाव टाकणे आणि धमक्या देणे असे प्रकार होत असल्याची त्यांनी या विषया संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्याध्यापक सिद्धार्थ दवणे यांच्याशी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल, लोकवेधने संपर्क साधला असता वरील सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले असून संबंधित शिक्षक आधीपासूनच वादग्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
———————————————————————-शाळेतील शिक्षिका अर्चना केंद्रे, नेहा शेवाळकर आणि स्मिता भुसावार यांनीही संबंधित शिक्षकांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, सततच्या वादामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
———————————————————————-

दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल राठोड यांनी शिक्षकांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.हा विषय गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला असून, शालेय पोषण आहाराचा साठा पारदर्शकपणे वाटप केला जाईल,शाळेच्या टिन पत्राविषयी आम्ही उत्तरं देऊ, असे त्यांनी बोलतांना स्पष्ट केले.
———————————————————————-
दरम्यान, गावकऱ्यांनी या वादामुळे शाळेची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त केली. शिक्षकांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यास प्राधान्य द्यावे आणि शाळेचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
———————————————————————-
वरील विषया संदर्भात आम्ही रीतसर चौकशी केली असून यात जिल्हा स्तरावरील चौकशीचा अंतिम अहवाल येणे अद्याप बाकीं असल्याने या प्रकरणात ठोस कार्यवाही बाकी आहे.
विजय बेतेवाड/ प्र.गटशिक्षण अधिकारी उमरखेड.
