दिंडाळा शाळेत शिक्षकांचा छळ व भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशीवर प्रश्नचिन्ह, प्रशासन मौनात

लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ एप्रिल 

 

उमरखेड (जि. यवतमाळ) 

 

जि.प.उ.प्रा. शाळा दिंडाळा येथे मुख्याध्यापक व काही शिक्षकांकडून विशिष्ट शिक्षकांचा छळ होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारकर्त्या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक सिद्धार्थ विठ्ठलराव दवने व इतर संबंधित शिक्षकांकडून मानसिक त्रास, दडपण व विविध प्रकारे छळ केला जात आहे. चौकशीच्या नावाखाली केवळ थातूरमातूर कारवाई होत असून तक्रारकर्त्यांवरच दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांच्या आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांवर पडदा टाकण्यासाठी काही शिक्षक व संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. तक्रार मागे घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा वापर करून दबाव आणला जात असल्याचेही सांगितले जाते.

याशिवाय, भ्रष्टाचाराला साथ न देणाऱ्या शिक्षकांना सक्तीने रजेवर पाठवणे, पगार रोखणे, महिलांच्या कायद्यांचा गैरवापर करण्याची धमकी देणे, तसेच बदलीसाठी दबाव टाकणे असे प्रकार घडत असल्याचे आरोप आहेत.

पूर्वीही २ जानेवारी २०१६ रोजी एका शिक्षकावर विद्यार्थ्यांसमोर हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, अशा घटनांमुळे शाळेतील वातावरण बिघडल्याची चर्चा आहे. सध्या आणखी एका शिक्षकावरही अशाच प्रकारचा दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.

तक्रारकर्त्यांना गावातील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचेही समोर आले असून त्यांच्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेतील अनुचित प्रकारांचे CCTV पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहितीही मिळत नसल्याची तक्रार आहे.

दरम्यान, याच तालुक्यातील दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापकावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली असताना, दिंडाळा प्रकरणात मात्र कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व शिक्षकांकडून होत आहे.

———————————————————————-

वरील विषया संदर्भात प्र.गटशिक्षण अधिकारी विजय बेतेवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली असून अद्याप चौकशी समितीचा अहवाल आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या