आमणी (खुर्द) मध्ये भीम जयंतीच्या बॅनरची तोडफोड; गावात तणाव

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

 

महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना घडली आहे.यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ८ एप्रिलच्या रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.अज्ञात इसमाने बॅनरवर दगड मारून तो फाडल्याचे समोर आले आहे.त्यामुळे बौद्ध व बहुजन समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी गजानन रोकडे यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून,पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे करत आहेत.

दरम्यान,गावातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेचा निषेध नोंदवला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.पोलिसांनी गावात शांतता राखण्यासाठी खबरदारी घेतली आहे.आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आमणी (खुर्द) हे गाव शांततेसाठी ओळखले जाते.येथे आजपर्यंत कोणताही वाद झालेला नव्हता. आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवर विविध महापुरुषांच्या प्रतिमा होत्या.या घटनेमुळे गावातील एकोप्याला धक्का बसला आहे.

घटनेच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून अभिवादन केले.प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या