महिलांचा ठाम निर्धार; १६ एप्रिलला मतदानातून ठरणार ‘दारू दुकान राहणार की बंद होणार’”

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

महागावच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या देशी दारू दुकान आणि वाईन बारविरोधातील महिलांच्या आंदोलनाला आता अंतिम टप्पा आला आहे. ‘बाटली आडवी करायची’ की नाही, याचा निर्णय येत्या १६ एप्रिल रोजी गुप्त मतदानातून होणार आहे.

या आंदोलनाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात महिलांनी दिलेल्या सह्यांची तपासणी केली. त्यात ४२ सह्या वैध ठरल्या. आवश्यक २५ टक्क्यांपेक्षा जास्त सह्या मिळाल्याने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मतदान घेण्याचे आदेश दिले.
सुरुवातीला या प्रक्रियेत उशीर होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र आता प्रशासनाने तारीख जाहीर केली असून, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता निकाल जाहीर केला जाईल.

महिलांची मागणी स्पष्ट आहे.प्रभागातील सीएल-३ क्रमांक ७९ असलेले देशी दारू दुकान आणि लगतचा वाईन बार बंद करावा. यासाठी त्या एकत्र येऊन लढा देत आहेत.
दरम्यान, काही जणांकडून मतदारांना पैसे,तीर्थयात्रा किंवा फिरायला नेण्याचे आमिष दाखवले जात असल्याच्या चर्चा आहेत. पण महिलांनी हे आमिष नाकारत “हा आमच्या सन्मानाचा प्रश्न आहे” असे सांगितले आहे.

यापूर्वी प्रभाग क्रमांक ८ मध्येही असेच मतदान होऊन दारू दुकान बंद करण्यात आले होते.त्यामुळे महागावात दुसऱ्यांदा अशी प्रक्रिया होत असून,ही बाब विशेष मानली जात आहे.

सध्या गावात या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. १६ एप्रिलचे मतदान केवळ दारू दुकान बंद होणार की नाही हेच ठरवणार नाही, तर पुढच्या स्थानिक राजकारणावरही त्याचा परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या