१५ दिवसांत कोटींचा खेळ ! कॅनॉल दुरुस्ती की निधी लाटण्याचा डाव ?
लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल
महागाव : –
तालुक्यातील अधरपुस प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या वेणी धरणाच्या मुख्य कॅनॉल दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.अवघ्या १५ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या कामात कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकल्पांतर्गत कॅनॉलचे खोलीकरण, साफसफाई,गेट दुरुस्ती तसेच मेकॅनिकल कामे करण्यात येणार आहेत.मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अपूर्ण आणि थातुरमातुर पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अवघ्या १५ दिवसांत सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात ५ ते ६ किलोमीटर कामही पूर्ण झाले नसताना इतक्या मोठ्या रकमांची उचल करण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
सदर कामासाठी एकूण सुमारे १८ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला असून, ३५ ते ४० किलोमीटर कॅनॉल दुरुस्ती अपेक्षित आहे.मात्र प्रत्यक्ष प्रगती अत्यंत संथ असताना बिलांची गती मात्र झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.
या प्रकरणात संबंधित ठेकेदाराने काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बिले मंजूर करून घेतल्याचा आरोप होत आहे.कामाचे योग्य मूल्यमापन न करता देयक मंजूर करण्यात आल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान,या कॅनॉलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असताना,अशा प्रकारच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
—–—————————————————————–
⬛चौकशीची मागणी जोर धरतेय
परिसरातील नागरिक व शेतकरी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणनियंत्रक विभागाकडून तपासणी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
आता या प्रकरणाकडे वरिष्ठ प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते आणि दोषींवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

