आगीमागे भ्रष्टाचार दडपण्याचा संशय’; नीलगाय शिकार प्रकरणही तापले,भाजप नेत्यांची वनमंत्र्यांकडे थेट तक्रार

लोकवेध न्यूज नेटवर्क / २९ एप्रिल २०२६

मुंबई:- 

काळी (दौ) वनपरिक्षेत्रातील नर्सरी जळीतप्रकरणामागे भ्रष्टाचार दडपण्याचा संशय व्यक्त होत असतानाच, नीलगाय शिकार प्रकरणानेही गंभीर वळण घेतले आहे. या दोन्ही संवेदनशील घटनांमध्ये तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी भाजपचे पुसद जिल्हा चिटणीस सुनिल रामभाऊ टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष विलास कवाणेसह अन्य पदाधिकाऱ्याने राज्याचे वनमंत्री मा. ना. गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, दि. १० मार्च २०२६ रोजी पोखरी शिवारात नीलगाय या वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. यापूर्वीही अशा घटना घडत असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वनसंरक्षण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पिंपळगाव–सारकिनी परिसरात वनविभागाने वृक्षलागवड केलेल्या अडीच हेक्टर क्षेत्रात लागलेल्या आगीत असंख्य वृक्ष भस्मसात झाल्याने ही केवळ दुर्घटना नसून, मागील गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.वन्यजीव संरक्षण आणि वृक्षलागवड या दोन्ही महत्त्वाच्या बाबींमध्ये दिसून आलेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या