दारू दुकानानं प्रभाग १ ची वाट लावली; ‘कलाल- दलालांच्या’ आमिषाला बळी पडाल तर त्रास तुमच्याच माथी !
लोकवेध न्यूज नेटवर्क / ११ एप्रिल
महागाव :-
प्रभाग क्रमांक १ मधील देशी दारू दुकानामुळे परिसराचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून, याचा थेट फटका इथल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि मालमत्तेच्या किमतींवर बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दारू दुकानाभोवती दिवसभर वाढलेली गर्दी, रस्त्यावरच होणारी अर्वाच्य शिवीगाळ, किरकोळ भांडणं आणि कुठंही बसून होणारी अस्वच्छता यामुळे नागरिक हैराण झाले असून विशेष :शाळकरी विद्यार्थिनीला आणि महिलांना बाहेर निघणं अवघड झालं आहे.
या,बिघडलेल्या वातावरणाचा सर्वाधिक फटका प्रॉपर्टी बाजाराला बसला आहे. घरं विकायला ठेवली तरी खरेदीदार पुढे येत नाहीत.तिकडे नको रे बाबा…अशी प्रतिक्रिया देत कर्मचारी, व्यापारी आणि भाडेकरू या भागापासून दूर राहणेच पसंत करत आहेत.परिणामी, घरं ओस पडण्याची शक्यता वर्तवली जात असून मोठ्याप्रमाणात प्रॉपर्टीचे भाव घसरले आहेत,त्यामुळे घरमालकांवर आर्थिक संकट ओढवण्याची वेळ आली आहे
दरम्यान,या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १६ एप्रिल रोजी महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.वाढत्या त्रासाला कंटाळलेल्या महिला मतदारांनी आता निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार केला असून मतदानासाठी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
मात्र,याच वेळी काहींकडून मतदारांना विविध आमिषे दाखवून मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. कुण्या कलालाच्या आणि दलालाच्या आमिषाला बळी पडाल तर हा कायमचा त्रास तुमच्याच माथी येणार,असा स्पष्ट इशारा स्थानिक जनआंदोलनातून देण्यात येत आहे. देवदर्शन, पर्यटन किंवा इतर प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या हक्कासाठी मतदान करा,अशी जनतेला साद घालण्यात येत आहे.
एकंदरीत,दारू दुकानामुळे प्रभाग १ मधील सामाजिक वातावरण पूर्णपणे ढासळले असून,त्याचा परिणाम सुरक्षेपासून थेट आर्थिक स्थितीपर्यंत होत आहे.आता १६ एप्रिलच्या मतदानातून मतदार ,काय कौल देतात, यावर या परिसराचे भवितव्य अवलंबून आहे.
